किसान सभेचा मोर्चाने महागाव शहर दणाणून गेले!

“जगाच्या पोशिंदाच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आ. लोणीकरांचा डी.बी.नाईकांनी या वेळी खरपून समाचार घेतला “
महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर ‘आश्वासन पाळा आक्रोश टाळा’ या मोर्चाचे अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारताचा लोकशाहीवादी युवा संघ कमेटी महागाव यांनी 7 जुलै रोजी कॉ. डी.बी. नाईक, कॉ.देविदास मोहकर यांच्या नेतृत्वात महागाव शहरातून भव्य लाल बावटा मोर्चाने महागाव शहर दणाणून गेले. विळा हातोडा तारा निशाणी असलेला लाल बावटा झेंडा खांद्यावर घेऊन मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण शहरातून भ्रमण करीत, नारे देत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेत गगनभेदी नारे देत डफडे वाद्यावर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राला माल्याअर्पण करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकरांचा या वेळी जाहीर निषेध करण्यात आला. कॉम्रेड डि.बी. नाईक यांनी मोर्चाला संबोधित करतांना शासनाकडे विविध मागण्या मांडल्या.
जन सुरक्षा विधेयक रद्द करा, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याप्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा, तसेच खाजगी पीकविमा योजना बंद करून सरकारी पिकविमा योजना लागू करण्यात यावी. ऊस उत्पादक व हळद पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण द्या. प्रलंबित पिकविमा रक्कम त्वरित वाटप करण्यात यावी. लाडक्या बहिणींना विधानसभ निवडणुकीपूर्वीचेच निकष कायम करून घोषणे प्रमाणे 2100 रुपये द्या. महिला बचत गटाला दहा लाख रुपये चोळी बांगडी म्हणून अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे प्रलंबित अनुदान द्यावे. या वर्षीच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे, घरांचे झालेले नुकसान रक्कम त्वरित अदा करावी. गावठाण विस्तारीकरण करुन गावालगत असलेल्या निवासी क्षेत्राचे खाजगी जमिनीतून क्षेत्रफळ वगळा तसेच सरकारी व खाजगी जागेतील अतिक्रमणे त्वरित कायम करा. शेतजमिनी खरेदी-विक्री नंतर पीक कर्ज कारणावरून फेरफारचे प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावेत. यावेळी जगाच्या पोशिंदाच्या, शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार लोणीकरांचा आपल्या भाषणातून वक्त्यांनी खरपून समाचार घेतला. किसान सभेच्या या मोर्चात हजारोच्या संख्येने बेरोजगार, शेतमजूर, कष्टकरी भर पावसात सहभागी झाले होते.कॉ. देविदास मोहकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या भाषणातून शासनाकडे विशद केल्या.



