महागाव पंचायत समिती शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी थंड बसत्यात!

” आठवडाभराने उशिरा दाखल झालेल्या चौकशी समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह “
महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियाना राबविण्यात आले. परंतु तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांनी काही केंद्रा वरून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली केल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात केली होती. तक्रारीची चौकशी करण्यासाठी दि. 22 एप्रिल 2025 रोजी समिती स्थापन करण्यात आली. चौकशी समिती आठवडाभराने उशिरा आल्याने चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह उद्भवत आहे.
या समितीने त्यांच्या मर्जीतील काही मुख्याध्यापकांची बयान घेऊन पुढील कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे शिक्षण विभागात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. चौकशी समितीला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दि. 22 एप्रिल 2025 रोजी पत्र देऊन दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु चौकशी समितीचे आठवडाभर उशिराने महागाव बिआरसी कार्यालयात 29 एप्रिल 2025 रोजी दाखल झाले. या मागचे कारण न समजण्यासारखे झाले आहे.
चौकशी समिती येण्यापूर्वी सर्व केंद्र संचालकांना लेखी स्वरूपात सूचना देणे आवश्यक असतांना देखील फक्त व्हाट्सअप ग्रुपवर चार ओळीचा मेसेज टाकून आपण साडेअकरा वाजता उपस्थित राहावे अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक, केंद्र संचालक या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. आपल्या मर्जीतील लोकांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवून त्यांची लेखी स्वरुपात असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे लिहून घेतल्यामुळे प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांना निर्दोष मुक्त होण्यासाठी अशा प्रकारचे चौकशी समितीने पाठीशी घातल्याची शिक्षण विभागात दबक्या आवाजात चर्चा होत आहे. विजय बेटेवाड हे शालांत प्रमाणपत्र परीक्षा दरम्यानच्या काळात कस्तोडियन या पदावर असतांना त्यांनी सोबत चार-पाच बीआरसीतील कर्मचारी घेऊन प्रत्येक केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी कॉपीमुक्त अभियान व्यवस्थित चालवल्या जात नाही, तुमच्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना देऊन सोबतच्या शिक्षका मार्फत केंद्र संचालकाला आर्थिक मागणी केली. यासंदर्भात चौकशी समितीने कुठली चौकशी केली याबाबत खुलासा केलेला नाही.विजय बेटेवाड यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी नगदी स्वरूपात तर काही ठिकाणी फोन पे व गुगल पेवर पैसे मागितले याचे पुरावे सुद्धा समितीने तपासायला हवे होते. परंतु बेटेवारांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी चौकशी समितीकडून प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.
(बॉक्स)
शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेली समिती ही भेटीवरच्या समकक्ष कर्मचाऱ्याकडून करण्यात आली. चौकशी लागण्यापूर्वी घेतलेल्या शिक्षण परिषदेमध्ये बेटेवाडे यांनी माझ्याकडे कायमस्वरूपी प्रभार येणार असल्यामुळे, मी तुमच्या प्रत्येक शाळेची चौकशी करून तुमच्यावर योग्य ती कार्यवाही करेल, अशा प्रकारची सूचना दिल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला त्रास होऊ नये म्हणून अनेकांनी त्यांच्या विरोधात बयान देण्याचे टाळले. बेटेवाडांनी त्यांच्या मर्जीतील लोकांची बयाने लिहून घेऊन स्वतःला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु या बाबत वरिष्ठांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, अशा प्रकारची मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.
(बॉक्स)
पंचायत समिती महागाव शिक्षण विभागातील बीआरसी कार्यालयाचा कारभार हा सर्वश्रुत आहे. या ठिकाणी अनेक कर्मचारी आपले विद्यालयाचे काम सोडून गेल्या अनेक वर्षापासून अधिकाऱ्यांची चमचेगिरी करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. यांच्यावर कार्यवाही कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.