महागाव जलशुद्धीकरण केंद्र दहा वर्षांपासून बंद — करोडो रुपयांची उधळपट्टी, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड साधारण सभेत दुरुस्तीसाठी ठराव; नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार का?

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागावमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असताना उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र तब्बल दहा वर्षांपासून बंद असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. हे केंद्र नगरपंचायतीने ‘हँडओव्हर’ करून घेतलेच नाही, ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते. तसेच पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असल्याने जागोजाग पाईप फुटण्याचे प्रकार सुरूच होते. ते आजही दुरुस्त नाही तरी महागावकरांना कधीच शुद्ध पाणी मिळाले नाही.
१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या साधारण समितीच्या सभेत ठराव क्रमांक १० — जलशुद्धीकरण केंद्र व पंप हाऊस दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करणे हा महत्त्वाचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचा पुन्हा अभ्यास करून तो कार्यान्वित करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले हे जलशुद्धीकरण केंद्र आज शोभेची वस्तू बनून पडले आहे. केंद्राची इमारत, यंत्रणा आणि पाणी पुरवठा व्यवस्था दुर्लक्षामुळे धुळखात पडली असून, नागरिकांच्या पैशांचा झालेला अपव्यय समोर आला आहे.
महागावकरांना आजपर्यंत शुद्ध पाणी मिळाले नाही, हीच मोठी शोकांतिका असल्याचे नागरिकांचे मत आहे. आगामी ५ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या सभेत हा विषय चर्चेला येणार असून, प्रत्यक्षात दुरुस्ती होऊन पाणीपुरवठा सुरू होईल का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



