Uncategorized

हात गमावलेल्या पीडिताला न्याय कधी? महागाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मुडणा परिसरात 31 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण अपघातात टेंभुरदरा (ढाणकी) येथील ज्ञानेश्वर खंडू कोल्हे यांना आपला उजवा हात गमवावा लागला. संबंधित अपघातात एमएच-26 एसी-2496 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याचा आरोप आहे.
अपघातानंतर जखमीवर उपचार सुरू असतानाही महागाव पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल झाला नसल्याचा, तसेच संबंधित ट्रक जप्त करण्यात आला नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गंभीर अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या पीडिताला अद्याप न्याय मिळालेला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
याप्रकरणी 13 मे 2026 रोजी अपराध क्रमांक 231/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (अ) व 125 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अपघातानंतर तब्बल चार महिन्यांनी पीडित व्यक्तीला न्यायाच्या मागणीसाठी स्वतः महागाव पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार द्यावी लागली, ही बाब चिंताजनक मानली जात आहे.
दरम्यान, वृत्त प्रसिद्ध करण्यासाठी माहिती संकलन सुरू असताना संबंधित ट्रक जप्त करण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे सुरुवातीपासूनच तत्पर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, पीडित व्यक्ती न्यायाच्या मागणीसाठी महागाव पोलीस ठाण्यात आली असताना आमचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी पीडित व्यक्तीकडून संपूर्ण घटनेची माहिती घेण्यात आली असून, उपलब्ध माहितीच्या आधारे हे वृत्त तयार करण्यात आले आहे.
या प्रकरणात तत्कालीन ठाणेदार धनराज नळे यांच्या कार्यकाळात एवढ्या गंभीर घटनेत अपेक्षित कारवाई झाली नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही काही गुन्ह्यांमध्ये दुर्लक्ष अथवा अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सर्व प्रलंबित तक्रार अर्जांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच न्यायापासून वंचित राहिलेल्या सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, न्याय न मिळालेल्या अशा सर्व प्रकरणांना येत्या काळात वाचा फोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button