Uncategorized

महागावात महिला पाकीटमार टोळीचा सुळसुळाट; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहर व परिसरात महिला पाकीटमार टोळ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करंजखेड येथील दगडू भीमराव माठाळकर यांचे १५ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू माठाळकर यांनी स्टेट बँकेतून १५ हजार रुपये काढल्यानंतर मध्यवर्ती बँकेत घरकुल योजनेचे पैसे जमा झाले आहेत का, याची चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १५ हजार रुपयांची चोरी केली. ही घटना ५ जून २०२६ रोजी घडली होती.
या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी ठाणेदार आबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार व पोलीस शिपायांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.
महागाव शहरात बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या पाकीटमार टोळ्यांचे प्रमाण मागील दोन वर्षांत वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही बाजारपेठेत महिलांकडून चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या प्रकरणात यवतमाळ येथील काही महिला संशयित असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी प्रभावी कारवाई न झाल्याने अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत प्रभारी ठाणेदार आबुरे यांनी सांगितले की, “सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, एक आरोपी जरी हाती लागला तरी संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी बाजारपेठ व बँक परिसरात सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.”
दरम्यान, बँकांमधून पैसे काढल्यानंतर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button