माळ पठारावर पाण्यासाठी भटकंती; जलजीवन योजनेवर प्रश्नचिन्ह

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पुसद तालुक्यातील माळ पठार परिसरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. इसापूर व पुस धरणासारखी मोठी जलस्रोत उपलब्ध असतानाही गेल्या पन्नास वर्षांत या भागात पाणी पोहोचले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्र सरकारच्या ‘हर घर नळ’ या उद्दिष्टाने राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत पुसद, महागाव व उमरखेड तालुक्यांमध्ये निकृष्ट दर्जाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. परंतु नळाला पाणी आले नाही. मात्र प्रत्यक्षात माळ पठारावर आजही पाण्याची तीव्र टंचाई कायम असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कागदोपत्री योजना पूर्ण दाखवली असली तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नळयोजना ठप्प असल्याचे दिसून येते. त्यामुळे “ही योजना केवळ भ्रष्टाचारासाठीच राबवली का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये माळ पठारावरील भीषण वास्तव समोर आले आहे. महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत असल्याचे दृश्य यात दिसत असून प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि विकासाबाबतची इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच माळ पठारावर तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



