मुळावा परिसरात रेतीमाफींचा उच्छाद; रात्री-अपरात्री वाळू चोरी, महसूल यंत्रणेवर संशयाची सुई

मुख्य संपादक
उमरखेड :
मुळावा परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकीने कळस गाठला असून रेतीमाफींचा धुमाकूळ उघडपणे सुरू आहे. नंदला–पेंडवून–सुकळी शिवार तसेच हातला, तिवरग, झाडगाव परिसरातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या सहाय्याने वाळूची सर्रास वाहतूक सुरू असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा काळा व्यवसाय फोफावत आहे.
या अवैध धंद्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे. घरकुल बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने लाभार्थ्यांना ८ ते १० हजार रुपये मोजून वाळू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे गरिब घरकुल धारक अडचणीत सापडले असून शासनाने त्यांना अधिकृतपणे वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
रेती चोरीमुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून नदीपात्र खोलवर खणले जात आहे. जलस्रोतांची पातळी खालावत चालली असून शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.
या सगळ्या प्रकारात महसूल विभागातील काही कर्मचारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याची जोरदार चर्चा आहे. तक्रारी होऊनही ठोस कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे. एखाद-दुसरी कारवाई केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोठ्या तस्करांवर हात टाकण्याचे धाडस प्रशासन करत नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मंडळ अधिकारी मुळावा किंवा संबंधित साज्या-कार्यालयात क्वचितच दिसतात. त्यामुळे तलाठ्यांवर त्यांची कुठलीही वचक नसल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा प्रशासन व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी व अवैध वाळू तस्करी कायमस्वरूपी बंद करावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन ठोस पावले उचलणार की रेतीमाफींच्या दबावाखाली गप्प बसणार, याकडे संपूर्ण मुळावा परिसराचे लक्ष लागले आहे.



