महागाव नगरपंचायत सभापतींच्या निवडीला अखेर मुहूर्त मिळाला!

“काँग्रेसचे गटनेते म्हणून शैलेश कोपरकर कामकाज पाहणार”
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जाहीर केलेला आहे. सोमवारी महागाव नगरपंचायत कार्यालयात उपविभागीय अधिकारी उमरखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
महागाव नगरपंचायत विषय समिती सभापती निवडणुकीचा कार्यकाळ 21 फेब्रुवारी 2025 रोजी संपुष्टात आला होता. महागाव नगरपंचायतच्या काँग्रेस पक्षाच्या काही नगरसेवकांनी गटनेते पदा बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे वादविवाद सुरू असल्यामुळे ही निवडणूक तत्कालीन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पुढे ढकलली होती. या बाबत 12 एप्रिल पहिली हेरिंग होती तर 25 जून दुसरी हेरिंग घेण्यात येणार होती. पंकज आशिया यांनी गट नेत्याबाबत आदेश सुद्धा जाहीर केला परंतु त्या आदेशाला आव्हान देत शैलेश कोपरकर यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून 6 मे 2025 रोजी नागपूर खंडपीठाचे अनिल पानसरे यांनी कोपरकर यांच्या वतीने निकाल देत दिलासा दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळवली. त्यामुळे नगरपंचायत काँग्रेस पक्षाचे गटनेते शैलेश कोपरकर आता कामकाज पाहतील हे स्पष्ट झाले. दि. 25 जून पर्यंत न्यायालयाकडून शैलेश कोपरकर यांना दिलासा मिळाला. महागाव नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवडणुकीमुळे अनेक विकासात्मक कामात अडथळा निर्माण होत होता. स्थायी समिती गठीत नसल्यामुळे विविध विकासात्मक कामांना मंजूर देण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुनंदा कोपरकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निवडणुका लावण्याबाबत कळविले होते. त्या वरून जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विषय समिती सभापती पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सोमवारी 26 मे रोजी नवनिर्वाचित सभापती कोण होणार ? या बाबत जनतेला उत्सुकता लागली. सभापती पदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.