हिमायतनगरमध्ये नगरपंचायतीची धडक कारवाई; बुलडोझरच्या साहाय्याने शहरातील अतिक्रमणे उद्ध्वस्त!

हिमायतनगर ,(तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
हिमायतनगर शहरात आज नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमणांविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि मोठी कारवाई राबवली. नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात शहराच्या विविध भागांतील मुख्य रस्ते तसेच सार्वजनिक जागांवरील सर्व प्रकारची अतिक्रमणे बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आली.
या व्यापक कारवाईदरम्यान हजरत उमर चौक, प्रसिद्ध परमेश्वर मंदिर परिसर, मुख्य बाजार चौक आणि पोलीस स्टेशन परिसरासह शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकांना अतिक्रमणमुक्त करण्यात आले. रस्त्यावर नागरिकांच्या व वाहनांच्या रहदारीस अडथळा ठरणारे तात्पुरते शेड, अनधिकृत टपऱ्या, जाहिरात फलक आणि इतर बांधकामांवर प्रशासनाने थेट बुलडोझर चालवला.
कारवाईची तीव्रता पाहून अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले साहित्य हटवून घेतले, तर काही ठिकाणी प्रशासनाला कडक भूमिका घेत थेट बुलडोझरचा वापर करावा लागला. या मोहिमेमुळे शहरातील वर्षानूवर्षे प्रलंबित असलेला वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. ही धडक कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.
नगरपंचायत प्रशासनाने अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे की, सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील कोणतेही अनधिकृत बांधकाम यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. शहर सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहील.
प्रशासनाने सर्व व्यावसायिक व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे त्वरित स्वेच्छेने काढून घ्यावीत. अन्यथा नियमानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता थेट बुलडोझरद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नगरपंचायतीच्या या धडक मोहिमेमुळे संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



