Uncategorized

४० वर्षांपासूनचा पांदण रस्ता अतिक्रमणामुळे बंद; कोनदरीतील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मौजा कोनदरी येथील ४० वर्षांपासून वापरात असलेल्या पांदण रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत दोन शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून तातडीने रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.
प्रेमसिंग बाला राठोड व भिकमचंद बाला राठोड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या शेतजमिनीत जाण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून पांदण रस्त्याचा वापर केला जात आहे. मात्र, ख्वाजा आफताब अहमद यांनी गट क्रमांक १८ मधील शेतात नांगरणी करून रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेतकऱ्यांचा मार्ग बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर जमीन संबंधित व्यक्तीच्या नावावर नसून काजी बसरत अली यांच्या नावावर असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या असून पेरणीची कामेही रखडली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची महसूल प्रशासनाने तातडीने पाहणी करून पूर्ववत पांदण रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती राज्यमंत्री इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे कोनदरी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button