गुंज येथील CCI कापूस खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा; व्यापाऱ्यांच्या निकृष्ट कापसाला ‘सुपर ग्रेड’, शासनाला कोट्यवधींचा चुना

महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील गुंज येथे सुरू असलेल्या CCI (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रावर गंभीर गैरप्रकार उघडकीस आला असून, व्यापाऱ्यांच्या पाणी मारलेल्या, कवडीमोल व निकृष्ट दर्जाच्या कापसाला थेट ‘सर्वोच्च प्रतिवारी सुपर ग्रेड’ देऊन शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे.
गुंज येथील मज्जित कॉटन संस्थेतील CCI कापूस खरेदी केंद्रावर हा गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच, तालुक्यातील स्थानिक समितीने आज अचानक छापा टाकून कारवाई केली. या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
छाप्यादरम्यान ग्रेडर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले असून, अनधिकृत व्यक्तीमार्फत कापसाचे ग्रेडिंग केले जात असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांचे ४ ते ५ वाहनांचे ओले व पाणी मारलेले कापूस थेट CCI खरेदीत घेतल्याचे आढळून आले.

या कारवाईत सहकार विभागाचे अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी संबंधित कापसाचा पंचनामा करून संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, शेतकऱ्यांच्या दर्जेदार कापसाला योग्य भाव न देता, व्यापाऱ्यांच्या निकृष्ट व पाणी मारलेल्या कापसाला मोठी रक्कम देऊन ‘सुपर ग्रेड’ लावली जात असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार म्हणजे थेट शासनाची फसवणूक असून शेतकऱ्यांच्या मेहनतीची लूट असल्याचा आरोप होत आहे.
या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषी व्यापारी, संबंधित ग्रेडर व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण खरेदी प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
“शासनाच्या नावाखाली व्यापाऱ्यांचा फायदा करून देणारी ही यंत्रणा शेतकऱ्यांचा घात करत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



