‘२५ दिवसांत पैसे दुप्पट’ योजनेत नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप; महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील काही नागरिकांना “२५ दिवसांत पैसे दुप्पट” करण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप समोर आला असून, याप्रकरणी लवकरच महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.
पीडित नागरिकांनी आपल्या प्रतिनिधीजवळ कैफियत मांडताना, स्थानिक एजंटांच्या माध्यमातून अल्पावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेक गरीब व सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात येत आहे.
फसवणूक झाल्याची शंका निर्माण झाल्यानंतर संबंधित नागरिकांकडून पुरावे व कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित एजंटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती आणि नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही आकर्षक गुंतवणूक योजनेत पैसे गुंतविण्यापूर्वी तिची कायदेशीरता व विश्वासार्हता तपासून पाहावी, असे आवाहनही जाणकारांकडून करण्यात येत आहे.



