महागाव तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे सावट कायम — घाणमूक येथे रोहिदास राठोड यांचे दुर्दैवी निधन

महागाव प्रतिनिधी – संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना ही दुःखद वस्तुस्थिती आज पुन्हा एकदा समोर आली. घाणमूक येथील शेतकरी रोहिदास नंदू राठोड वय 52 वर्ष यांनी आज दी 26-11-2025 रोजी सकाळी 8 सुमारास जंगलात झाडाला दोरी लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
घरून ते “जळणासाठी लाकूड आणायला जातो” असे सांगून निघाले होते; मात्र काही वेळातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. ते कर्जबाजारी असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
प्रशासनाकडे दुर्लक्षाचा गंभीर आरोप
महागाव तालुक्यात सलग शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना मार्गदर्शन किंवा योजनांचा लाभ देण्यात उदासीन असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक, शेतीविषयक आणि दुष्काळजन्य समस्यांवर कोणताही ठोस उपाय न केल्यामुळे दर महिन्याला एक तरी शेतकरी आत्महत्या करतो, ही मोठी शोकांतिका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचा मेळावा घ्यावा — नागरिकांची मागणी
महागाव तालुका पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्यासारखा असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि मानसिक, आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महागाव येथे तातडीने मेळावा घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
लोकप्रतिनिधी फक्त मतापुरते फिरतात, परंतु शेतकऱ्यांच्या खर्या समस्या सोडविण्यासाठी कोणी पुढे येत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
महागाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची गरज असल्याचा आवाज अधिक बुलंद होत आहे.



