शहर

महागावात अवैध धंद्यांचे जाळे; नागरिकांमध्ये नाराजी, बीट व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरात अवैध धंदे, मटका व अवैध दारू विक्रीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील काही भागांत अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रभारी ठाणेदारांनी अलीकडे केलेल्या कारवायांमुळे अवैध दारू विक्रीचे अनेक संपर्क व व्यवहार सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित बीटच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
याशिवाय मटक्याचे काउंटर सुरू असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. बाजाराच्या दिवशी चोरीला गेलेल्या मोबाईलसंदर्भातील काही प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून वास्तव परिस्थिती समोर आणावी, तसेच अवैध धंद्यांना संरक्षण देणारे किंवा दुर्लक्ष करणारे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महागाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्री, मटका, चोरी व इतर गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात विशेष मोहीम राबवून सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button