संबंधित विभागाने लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी रेल्वेच्या कामासाठी टिप्परच्या वाहतुकीमुळे शेतीपिकाला फटका

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड : सध्या तालुक्यामध्ये रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात चालू असून, तालुक्यातील पिंपरी दिवट येथे रेल्वेच्या कामासाठी अनेक टिप्पर वाहन मुरूम, खडक यांची वाहतूक करत आहेत. या वाहनामुळे दिवट पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांच्या उसाच्या वाहनाला खूप अडचण होत आहे. शेतकऱ्याच्या शेतात भाजीपाला आणि तूर, हरबरा, गहू आणि इतर पिकावर धूळ जास्त प्रमाणात उडत असल्यामुळे, शेतकऱ्याचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वाहनाचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्यापासून ते पिंपरी दिवट शिवारात मुरूम खडक घेऊन रेल्वे प्रकल्पाचे काम करण्यासाठी हे टिप्पर वाहन येत असून या वाहतुकीमुळे शेतात व गावात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे, त्याचा परिणाम शेतपिकावर होत असून गावातील वृद्ध माणसाला सुद्धा धुळीमुळे धोका निर्माण झाला आहे. गावातील लोकांचे शारीरिक स्वास्थ बिघडत आहे. याची गंभीर दखल संबंधित विभागाने घेऊन रस्त्यावर पाणी टाकून वाहने चालविल्यास, धुळीचा त्रास कमी होईल. अशी नागरिकाची मागणी आहे. रेल्वे प्रकल्पामध्ये या भागातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी गेल्या त्यामुळेच बरेच शेतकरी भूमीहीन सुद्धा झालेले आहेत. शेताला पाहिजे तेवढी रक्कम सरकार कडून मिळाली नसल्यामुळे व त्या शेतकऱ्याची जमीन अधिग्रहीत झाल्यामुळे पहिलेच शेतकरी शेतमजूर झाला आहे. राहिलेल्या जमिनीत सुद्धा अशा प्रकारच्या धुळीच्या शेतातील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संबंधित विभागाने यावर ताबडतोब उपाययोजना न केल्यास शेतकरी आणि गावकरी मंडळी आंदोलनाच्या तयारीत आहेत. ह्या रस्त्यावरून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिवसभर ही वाहतूक चालू राहील्यामुळे प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी रस्त्यावर पाणी टाकून यावर उपाययोजना करावी, अशी दिवट पिंपरी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.



