जय जवान, जय किसान’चा नारा फक्त कागदावरच? शासकीय फी भरूनही २० हजारांची मागणी अन् महिनोनमहिने हेलपाटे! गरीब शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार? हिमायतनगर भूमी अभिलेख विभागातील मुजोर कारभाराचा पर्दाफाश!

(हिमायतनगर तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम)
देशात बळीराजाचा गौरव केला जातो, पण प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर मात्र त्याचीच नाहक अडवणूक व छळ केला जात असल्याचा संतापजनक प्रकार हिमायतनगरमध्ये उघडकीस आला आहे.
बोरगडी येथील शेतकरी मारुती विठ्ठल पांचाळ यांनी जमिनीच्या रस्त्यासाठी नियमानुसार सर्व अधिकृत फी भरली होती. तरीही गेल्या ४ महिन्यांपासून त्यांचे काम लटकवून ठेवण्यात आले. काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट २०,००० रुपयांची लाच मागितली. जेव्हा या शेतकऱ्याने लाच देण्यास असमर्थता दर्शवून जाब विचारला, तेव्हा मुजोर कर्मचाऱ्याने त्यांना अद्वातद्वा बोलून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली.
जो शेतकरी संपूर्ण देशाचे पोट भरतो, त्यालाच आज स्वतःच्या हक्काच्या कामासाठी सरकारी कचेऱ्यांचे चक्कर मारावे लागत आहेत. प्रामाणिकपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्याला प्रशासनाकडून अशी लाजीरवाणी वागणूक मिळत असेल, तर या देशात शेतकऱ्याला खरोखर न्याय मिळणार का?
प्रशासकीय भ्रष्ट कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी पीडित शेतकऱ्यासह तहसील कार्यालयावर धाव घेतली. “शासकीय कार्यालयातील हा भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची पिळवणूक तात्काळ थांबली पाहिजे,” असे सांगत त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी या भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.



