धनोडा येथे ३० पेट्या देशी दारू पकडली; महागावातील दुकान बंद करण्याची मागणी

चिल्लर विक्रेत्याकडून खुल्या होलसेल दरात विक्रीचा आरोप; दुकानमालकासह दिवाणजीवर कारवाईची नागरिकांची मागणी
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधील देशी दारू दुकानाशी संबंधित व्यक्तींकडून धनोडा-मुडाना परिसरात खुल्या होलसेल दरात देशी दारूची विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारवाईदरम्यान सुमारे ३० पेट्या देशी दारू एका वाहनातून पकडण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये दुकानाचा दिवाणजीही दारू विक्री करताना आढळून आल्याचे सांगण्यात येते.
या प्रकारामुळे महागाव शहरातील देशी दारू दुकानाच्या विक्री व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दारू विक्रीच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित परवानाधारकाविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच महागाव येथील संबंधित देशी दारू दुकानाचा परवाना रद्द करून दुकान तातडीने बंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, अशीही मागणी काही नागरिकांनी केली आहे. मात्र कोणत्या कायद्यांतर्गत आणि कोणती कलमे लागू होतात, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाची उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी नागरिकांची मागणी आहे.



