शहर

जिल्हा परिषद महिला आरक्षित जागेवर चुरस; महागावमध्ये राजकीय समीकरणे तापली

भाजप आमदारांची कामाची घोषणा कागदावरच? कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली

महागाव (प्रतिनिधी – संजय नागरगोजे)
जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महागाव तालुक्यातील महिला आरक्षित जागेवरून राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि भाजप या प्रमुख पक्षांत इच्छुकांची नावं चर्चेत असून तिकीटासाठी चुरस निर्माण झाली आहे.

भाजपच्या स्थानिक संघटनेत समन्वयाचा अभाव आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष अंतर्गत अडचणीत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे दोन्ही गट तालुक्यात प्रभाव निर्माण करण्यात अपयशी ठरले असून जातीय समीकरणांवर निवडणूक लढविणे कठीण ठरेल, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सर्वेक्षण आणि समीकरणे

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व पक्षांनी गुप्त सर्वेक्षण सुरू केले असून “नवीन, प्रभावी आणि जनतेत संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा” विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. महागाव तालुक्यातील ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती मतदारसंघांवर वरिष्ठ नेतृत्वाचे विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे.

काँग्रेसकडून माजी मंत्री व स्थानिक नेत्यांच्या शिफारशींवर उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

भाजपवर टीका – आमदारांच्या कामांवर प्रश्नचिन्ह

भाजपकडे सत्ताधारी आमदार असूनही प्रभावी नेतृत्वाचा अभाव जाणवत असल्याची चर्चा आहे. निधी उपलब्ध नसताना काही विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले असून, “कामांची घोषणा कागदावरच दिसते, प्रत्यक्षात परिणाम नाही”, अशी नाराजी कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी गटांतही मतभेद

राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजितदादा गट या दोन्ही गटांतील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत मतभेद आणि उमेदवारी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष

या वेळी महिला आरक्षित जागेसाठी उमेदवार निवडताना मागासवर्गीय प्रतिनिधित्व, जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी सांगड आणि स्थानिक लोकप्रियता हे निकष निर्णायक ठरणार आहेत.
महागाव तालुक्यातील राजकीय तापमान चढले असून आगामी निवडणुकीत नवे चेहरे आणि नव्या समीकरणांची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button