मुंबईत राजकीय भूकंप! साहेबराव कांबळे आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुख्य संपादक
मुंबई, दि. 07 जून 2025: यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेले साहेबराव कांबळे आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या ऐतिहासिक पक्षप्रवेशासाठी उमरखेड शहर शिवसेना, तालुका शिवसेना पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून, साहेबराव कांबळे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांचा मोठा गट देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, अलीकडील विधान परिषद निवडणुकीनंतर साहेबराव कांबळे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र आता त्यांनी थेट शिवसेना (शिंदे गट)ची वाट धरल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईत दाखल झालेल्या उमरखेडच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “साहेबराव कांबळे यांच्या प्रवेशामुळे उमरखेड तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश हा केवळ पक्षप्रवेश नसून उमरखेडच्या राजकारणातील नव्या समीकरणांची नांदी ठरणार आहे,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



