जीवनविद्या मिशन स्वच्छ पर्यावरण जनजागृती अभियान

मुंबई प्रतिनीधी: महेश कदम
भारत सरकार मार्फत ०२ ऑक्टोबर “स्वच्छता ही सेवा” अभियानाबाबत आव्हान
करण्यात आले होते. भारत सरकारच्या आव्हानाला अनुसरून व थोर समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्म शताब्दी वर्षांत पर्यावरण हाच नारायण या सिद्धांतानुसार जीवनविद्या मिशन ने स्वच्छ पर्यावरण अभियान अंतर्गत बुधवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळे मध्ये शिवाजी पार्क मैदान, दादर येथे स्वच्छ पर्यावरण संदर्भात जनजागृती करण्यासाठी मानवी साखळीचे व प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छता प्रचारफेरी, मानवी साखळी व पथनाट्य तसेच ‘मी पर्यावरण स्नेही’ स्वाक्षरीफलक मार्फत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे पुनर्वापरासाठी (Recycling) बृहन्मुंबई महानगरपालिकेला देणे. तसेच पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकचा वापर टाळणे अथवा कमी करणे या संदर्भात जनजागृती करण्यात आली. जीवनविद्या मिशनच्या बालसंस्कार केंद्रातील मुलांनी स्वच्छता विषय आधारित आकर्षक पोस्टर्स आणुन स्वच्छ पर्यावरण अभियान प्रचारफेेरीत भाग घेतला. तरूण युवा नामधारकांनी प्लास्टिकचा ब्रम्ह राक्षस हे पथ नाट्य प्रभावीपणे सादर केले.
तसेच “मी पर्यावरण स्नेही” या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून अनेकांनी प्रतिसाद दिला.

सदर स्वच्छ पर्यावरण जन जागृती उपक्रमात ३५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमासाठी मुंबई सचिव भाजप श्री.जितेंद्र राऊत, विश्वस्त श्री.सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी आणि सौ.अक्षता ताई तेंडुलकर, माहीम विधानसभा अध्यक्षा व स्थानिक विभाग प्रमुख श्री.महेश सावंत, तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डचे व मुख्य मलनिःसारण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्थानिक शिवाजी पार्क पोलीस ठाणे, वाहतूक विभाग पोलीस यांचे सहकार्य लाभले. त्यावेळी स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांचा, स्थानिक शिवाजी पार्क पोलीस आणि विभागातील समाजसेवी मान्यवरांचा कृतज्ञतापूर्वक पर्यावरणपूरक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची-विश्वशांतीची या घोषवाक्याने तसेच स्वच्छता प्रतिज्ञा व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.



