हिवरा संगम परिसरात अवैध रेती उत्खनन; शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान, गुन्हा दाखल करण्याची मागणी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा संगम परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी तिवरा संगम येथील शेतकरी अविनाश लक्ष्मण नरवाडे यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देऊन रेती तस्करांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रेती घाटांचा अधिकृत लिलाव झालेला नसतानाही हिवरा संगम परिसरातील पूस व पैनगंगा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन केले जात आहे. ही रेती चोरी शासनाच्या मालमत्तेची लूट असून पर्यावरणाला देखील मोठा धोका निर्माण करणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
नरवाडे यांच्या शेताजवळून नदी वाहत असल्याने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी नदीपात्रातून पाइपलाइन टाकली आहे. मात्र रेती तस्कर ट्रॅक्टर व इतर वाहनांसाठी त्यांच्या शेतातून अनधिकृत रस्ता वापरत असल्याने पाइपलाइन वारंवार तुटत आहे. त्यामुळे शेतीचे सिंचन विस्कळीत होत असून मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय रेती वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने शेतातील रस्त्यांवरून वेगाने धावत असल्यामुळे रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली आहे. रात्रीच्या वेळी ही वाहने भरधाव धावत असल्यामुळे परिसरात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या रेती तस्करांनी परिसरात गुंडगिरीचे स्वरूप धारण केले असून विरोध करणाऱ्यांना धमकावले जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन रात्रीच्या वेळी नदीपात्रात विशेष गस्त पथक नेमून अवैध रेती तस्करी तात्काळ बंद करावी, तसेच शेताचे व पाइपलाइनचे नुकसान करणाऱ्या संबंधित वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवाडे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
टीप :
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सुमारे दीड वर्षांपूर्वी नरवाडे यांची पिकअप गाडी चोरीला गेली होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्याप ती गाडी शोधण्यात यश आले नसल्याने त्यांच्या कुटुंबासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. असे बरेच वाहक चोरीला गेले पण त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. पोलिसांनी तात्काळ चोरीचा गुन्हा उघड करून कारवाई करावी चोरी गेलेले वाहन धारकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.



