महागाव नगरपंचायतीत ‘किडनॅप ड्रामा’ फसला! उपाध्यक्षांनीच रचली पिक्चर-टाईप कहाणी; पोलिसांच्या चौकशीत सत्य उघड

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतीतील भ्रष्टाचार, अवैध ठराव आणि दारू दुकानांच्या परवानग्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, नगरपंचायत उपाध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांनी सहकुटुंब अपहरण झाल्याची बनावट कहाणी रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीमुळे हा ‘किडनॅप ड्रामा’ अवघ्या काही तासांतच उघड झाला.
दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दोन वाजता, अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून संपूर्ण कुटुंबाचे अपहरण केल्याची अफवा महागाव परिसरात पसरवण्यात आली. याबाबत चुकीची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली, तसेच ठराविक मित्रांना फोन करून संभ्रम निर्माण करण्यात आला. परिणामी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली.
मात्र तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक वास्तव समोर आले. उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे हे स्वतःच सहकुटुंब आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. बिजोरा टोलनाक्यावर ते स्वतः गाडी चालवत असल्याचे पुरावे मिळाले. गाडीची चाबी ठेवून वाहन मानवाडी फाटा (हदगाव पोलीस स्टेशन हद्द) येथे सोडण्यात आले होते, तर कुटुंब थेट सासरवाडीला गेल्याचे निष्पन्न झाले.
महागाव येथे उपविभागीय अधिकारी गायकवाड, एलसीबीचे गावंडे व त्यांचे पथक दाखल झाले. महागाव पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशी सुरू असतानाच उपाध्यक्षांचा भाऊ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला; मात्र पोलिसांच्या कडक चौकशीसमोर त्याची बोलतीच बंद झाली आणि अखेर संपूर्ण बनावट प्रकार उघडकीस आला.
विशेष म्हणजे, यापूर्वीही खोटी तक्रार, बनावट हल्ला, धमकी, सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले आरोप अशा प्रकारांचा जुना इतिहास पोलिस रेकॉर्डमध्ये आढळून आला. हे सर्व तपशील गायकवाड साहेबांच्या निदर्शनास आले असून, जुने रेकॉर्ड काढल्यानंतर बनवाबनवीचा पॅटर्न स्पष्ट झाला आहे.
दरम्यान, महागाव नगरपंचायतीत खोटे दस्तावेज, बनावट ठराव, भ्रष्टाचार, अवैध दारू दुकानांच्या परवानग्या यामुळे वातावरण आधीच तापलेले आहे. प्रभाग क्रमांक १ व १७ मधील देशी दारू दुकाने बंद करण्यासाठी ठराव आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच हा ‘किडनॅप ड्रामा’ घडवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने कामाला लावण्यात आले, अशी गंभीर बाब समोर आली असून, खोटी तक्रार व अफवा पसरवणाऱ्यांवर लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
महागावमध्ये सध्या विकासाऐवजी नाट्य, ड्रामा आणि पिक्चर-टाईप राजकारण सुरू असल्याची चर्चा चौकाचौकात रंगली आहे.
“महागाव नगरपंचायतीवर तीन तासांचा फुल एंटरटेनमेंट पिक्चर निघू शकतो,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता नागरिकांमध्ये उमटू लागली आहे.



