शासकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतरही गुन्हा दाखल नाही; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव तालुक्यातील राहूर येथील प्रकार; चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाईचे आदेश असल्याचा दावा
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी अंतर्गत उपकेंद्र राहूर येथे अंशकालीन परिचर पदाच्या निवडीसंदर्भात प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समिती गठित केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या आदेशानुसार झालेल्या चौकशी समितीचा दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत राहूर येथील प्रशासक शिवाजी रामचंद्र गोपनवाड यांच्याविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी यांनी ठाणेदार, पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याचे सांगण्यात येत आहे. पत्र प्राप्त झाले मात्र, तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या वशि-1522/2026 या आदेशाचा तसेच चौकशी समितीच्या अहवालाचा आधार घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचा दावा आहे. शासकीय अधिकाऱ्यानेच लेखी तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
राहूर गावातील नागरिकांनी या प्रकरणात पोलिस प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे राहूर गाव बिटरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने संबंधित तक्रार तेथे देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
चौकशी समितीच्या अहवालात नेमके कोणते निष्कर्ष नोंदविण्यात आले, गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोणत्या कलमांनुसार देण्यात आले आणि पोलिसांनी अद्याप एफआयआर का दाखल केला नाही, याबाबत आता पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



