घरकुल लाभार्थ्यांच्या फसवणूकीची चौकशी करा

संजय पळसकर यांचे बीडीओंना निवेदन
शेख मुजाहिद सह-संस्थापक
सोनदाभी येथे प्रधानमंत्री मोदी आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांची रक्कम आपल्या मर्जीतील व्यक्तीच्या खात्यात जमा करून संबंधित ग्राम रोजगार सेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संगनमताने विल्हेवाट लावल्या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सोनदाभी येथील रहिवासी प्रकाश मिरदोडेवाड यांची आई नामे पंचफुलाबाई व बहिण छाया अनारपल्लू यांचे नावाने सन 2023 24 वर्षात पंतप्रधान मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. बांधकामाच्या प्रगतीनुसार त्यांना त्यांच्या खात्यात तीन हप्त्यांचे एक लाख रुपये प्राप्त झाले मात्र रोजगार हमीच्या जॉब कार्ड चे अंतर्गत मिळणारी उर्वरित रक्कम संबंधित रोजगार सेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीच्या कुटुंबाचे जॉब कार्ड वापरून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून ती परस्पर हडपली असल्याचे उमरखेड पंचायत समिती येथील अभियंत्याकडे अधिक चौकशी केली असता प्रकाश मिरदोडेवाड यांच्या निदर्शनास आले
. सदर प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन संबंधित ग्राम रोजगार सेवक व ग्राम पंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करून संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक संजय पळसकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
चौकट
परस्पर हडपलेली रक्कम त्यांच्याकडून वसुल करा
या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित रोजगार सेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांची कसून चौकशी करून परस्पर हडपलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करून द्यावी व मला न्याय द्यावा अन्यथा मला आमरण उपोषणाला बसावे लागेल अशी तक्रार प्रकाश मिरदोडेवाड यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती.



