आज प्रजासत्ताक दिन……..

सहसंपादक शेख मुजाहिद
आज ७७ वा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन केवळ ध्वजारोहण देशप्रेम जागवणारे गाणे इतक्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही. तर आजूबाजूला घडणाऱ्या घटना प्रसंगाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी सुद्धा विकसित होणे महत्त्वाचे आहे असे वाटते. अलिकडे आपण बघतोय कि, ज्यांना आपण स्वायत्त संस्था म्हणतो ते निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल किंवा अजुन कुठल्या स्वायत्त संस्था असतील. ते एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधलेल्या आहेत कि काय असा प्रश्न देशात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना प्रसंगाकडे बघितले कि उभा राहतो. अनेक वेळा या स्वायत्त संस्था सत्ताधारी पक्षाच्या सोयीनुसार वागताना देखील आपल्याला दिसतात. सर्वोच्च न्यायालय अनेक वेळा वेळेच्या नावावर कित्येक अन्यायावर मौन पाळताना आपल्याला दिसते. म्हणजे लोकशाही केवळ मतपेटीत किंवा सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीनेच मरते असे नाही तर अशा स्वायत्त संस्थांच्या अधःपतनाने देखील लोकशाही धोक्यात येते. सध्या होणाऱ्या संवैधानिक मुल्यांच्या पायमल्ली मुळे मला असे वाटते की आता लोकशाहीचा आत्मा देखील गुदमरत असावा. सत्ताधाऱ्यांविरुध्द प्रश्न विचारले जातात तेव्हा अनेकांना देशद्रोही ठरवले जाते. तेव्हा आपण देखील हे समजून जाव की आपल्या प्रश्नांमुळे धोका हा राष्ट्राला नाही तर सत्तेला आहे. आणि ज्या वेळेला सत्ता ही या स्वायत्त संस्थापेक्षा किंवा संविधानापेक्षा मोठी होते तेव्हा प्रजेच राज्य केवळ कागदावरच राहते. तेव्हा प्रजासत्ताक दिन केवळ ध्वजारोहण देशप्रेम जागवणारे गाणे इतक्यापुरता मर्यादित राहून जातो. असे असले तरी पुन्हा एकदा आपल्या प्रजेच्या सत्तेला नवचैतन्य मिळाव या अपेक्षेसह सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक सदिच्छा
अविनाश चंद्रवंशी.



