महागाव नगरपंचायतमध्ये 26 जानेवारीला ‘नगरसेवक विरुद्ध नगरसेवक’ आखाडा; विकासाऐवजी वाद रंगले समोसा फेकण्याच्या घटनेने शहरात खळबळ, जनतेत तीव्र नाराजी

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायतमध्ये 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच नगरसेवकांमध्ये वाद चिघळून थेट आखाड्यात रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याऐवजी नगरपंचायतमध्ये राजकीय कलह आणि असभ्य वर्तनाचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनाकारण अपशब्द बोलू अपमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाने काँग्रेसच्या नगरसेवकावर समोसा फेकल्याची घटना घडली. यापूर्वी काँग्रेस नगरसेवकाने भाजप नगरसेवकाची थट्टा केल्याने वाद निर्माण झाला आणि वादाचे रूपांतर हातघाई व अपमानास्पद प्रकारात झाले. उपस्थितांनी दोन्ही बाजूंना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरपंचायतचा सभागृह क्षणभर राजकीय आखाड्यासारखा दिसू लागला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व विकासात्मक उपक्रम राबवणे अपेक्षित असताना, नगरसेवकांच्या वादामुळे नगरपंचायतचा विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. शहरात चौका-चौकात या घटनेची चर्चा रंगली असून, “आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अशी कृती करत असतील तर पर्याय काय?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या नगरपंचायतमध्ये विकासाऐवजी एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे राजकारण सुरू असल्याची टीका होत आहे. त्यामुळे महागाव शहर विकासापासून कोसो दूर जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनेनंतर येणाऱ्या निवडणुकीत जनता अशाच नगरसेवकांना पुन्हा संधी देईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महागावमधील जाणकार नागरिक व कार्यकर्ते आता सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख उमेदवार शोधण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.



