उमरखेड बायपासवर ट्रॅफिक पोलिसांचा ‘तळ’… खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा अचानक धडक तपास

मुख्य संपादक
उमरखेड:-उमरखेड हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. नागेश पाटील आष्टीकर वाहनधारकांना विनाकारण अडवण्यावर संताप; कर्मचाऱ्यांना जागेवरच खडसावले नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्तक्षेपामुळे उमरखेड बायपासवरील ट्रॅफिक पोलिसांच्या कारभारावर आज चांगलाच पडदा उघडला. अनेक दिवसांपासून वाहनधारकांकडून येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत खासदारांनी आज अचानक बायपासवर धडक देत परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान चार ते पाच वाहनधारकांना ट्रॅफिक पोलिसांनी अडवून ठेवलेले आढळले. हे पाहताच खासदार आष्टीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जागेवरच धारेवर धरत “जनतेला विनाकारण अडवून त्रास देणे चालणार नाही” असा कडक इशारा दिला.

विशेष म्हणजे, उमरखेड शहरात वाहतुकीची मोठी समस्या असताना शहरातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी बायपासवर तळ ठोकून वाहनधारकांना अडवणे कितपत योग्य आहे, असा सवालही खासदारांनी उपस्थित केला. यावेळी काही वाहनधारकांनीही आपली व्यथा मांडत पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली.
घटनास्थळीच खासदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागावे अशा स्पष्ट सूचना दिल्या. जनतेच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद देत थेट घटनास्थळी पोहोचून प्रशासनाला जाब विचारण्याची खासदारांची शैली पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर उमरखेड परिसरात ट्रॅफिक विभागाच्या कामकाजावर मोठी चर्चा रंगली असून “जनतेला त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.



