ट्रॅक्टरखाली पिके, पैनगंगेतून रेतीची लूट! हातला परिसरात अवैध उत्खनन; विरोध करणाऱ्यांना दमदाटी

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड : शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार तालुक्यातील सर्व सातही रेतीघाट बंद असतानाही, दिवटपिंपरी व नांदला रेतीघाटांच्या मधोमध येणाऱ्या हातला गावलगत पैनगंगा नदी काठावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नदीपात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. या बेकायदेशीर कारवायांमुळे नदीकाठावरील शेतजमिनींचे मोठे नुकसान होत असून, उभ्या पिकांवर ट्रॅक्टरचे टायर फिरल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत.
प्रशासन शेतकरी या प्रकाराला विरोध करताच त्यांना उघडपणे धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे. “काही बोललात तर भानगडीत अडकवू,” अशा प्रकारची दादागिरी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी नाव न सांगण्याच्या अटीवरच आपली व्यथा मांडत आहेत.
परिसरात अशीही चर्चा रंगली आहे की, या अवैध रेती उपशाला काही महसूल कर्मचाऱ्यांचे छुपे संरक्षण मिळत आहे. एका कर्मचाऱ्याचा थेट माफियांशी संबंध असल्याचा आरोपही स्थानिकांनी नाव न घेता केला आहे. “प्रशासनाच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी शक्यच नाही,” असे संतप्त शेतकरी सांगतात.
दरवर्षी अशाच प्रकारे रेती चोरी सुरू राहते, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने चोरट्यांची दादागिरी वाढतच आहे. यंदा तर माध्यमांनाही दमदाटीच्या घटना घडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
अवैध रेती उपशामुळे नदीचे नैसर्गिक संतुलन बिघडत असून, भविष्यात पूरस्थिती व जलसंकटाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमींनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
या सर्व प्रकाराकडे उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
प्रश्न एकच :बंदी असतानाही रेती चोरीला कोणाचा ‘आशीर्वाद’?



