आरणी येथे उरूस यात्रेच्या पार्श्वभूमीवर मटका जुगाराचा सुळसुळाट पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल(भाग १)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आरणी येथे सध्या सुरू असलेल्या उरूस यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून या संधीचा गैरफायदा घेत अवैध मटका जुगार खुलेआम सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. मटन मार्केट परिसरासह विविध ठिकाणी मटक्याचे काउंटर थाटण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत.
यात्रेमुळे झालेल्या गर्दीचा फायदा घेत मटका बाजारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी मटक्याची दुकाने उघडपणे सुरू असून याबाबत पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
अवैध मटका व्यवसाय पोलीस ठाण्याच्या माहितीशिवाय सुरू असू शकत नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये असून ‘याला पाठबळ कोणाचे?’ असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. हप्ते देऊन मटका व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा असल्या तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून सामाजिक प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आरणी परिसरातील सर्व अवैध मटका धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



