Uncategorized

खेडी–वनोली शेतरस्त्यावरील अतिक्रमणाची तक्रार; तहसीलदारांचे चौकशीचे आदेश, अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह

महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील मौजा वनोली–खेडी ते चिखलगड जाणाऱ्या शेतरस्त्यावर कथित अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी संबंधित महसूल अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, आदेशानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप तक्रारदार व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

देवधामा राठोड (कासारी) यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या अर्जात, शेतकऱ्यांना खत, बियाणे, शेतीमालाची वाहतूक तसेच शेतीकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या शासकीय पांदण रस्त्यावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संबंधित रस्ता तात्काळ मोकळा करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

या अर्जाची दखल घेत तहसीलदारांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (वनोली–खेडी) यांना घटनास्थळी प्रत्यक्ष पंचनामा करून रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे अथवा नाही, याची सविस्तर चौकशी करून अहवाल तातडीने तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, तहसीलदारांच्या आदेशानंतरही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, शासनाच्या परिपत्रकानुसार पांदण रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

यासंदर्भात तहसीलदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “मंडळ अधिकारी व तलाठी यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण आढळल्यास ते हटवून पांदण रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात येईल.”

दरम्यान, संबंधित अतिक्रमणाच्या आरोपांची सत्यता महसूल विभागाच्या चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button