जनावरे चोरी करणाऱ्या टोळीच्या संशयित वाहनाचा अपघात; परिसरात खळबळ

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मोहदी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक संशयित चारचाकी वाहन नियंत्रण सुटून पुलाखालील नाल्यात कोसळल्याची घटना घडली. वाहनावर कोणतीही नंबर प्लेट नसल्याने तसेच वाहनामध्ये जनावरांना गुंगी देण्यासाठी वापरले जाणारे इंजेक्शन आढळल्याने हे वाहन जनावरे चोरी करणाऱ्या टोळीशी संबंधित असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अपघातानंतर वाहनातील सर्व व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. परिसरात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटना वाढल्या असून, यापूर्वीही गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरीचा प्रयत्न झाल्याच्या चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट पुलाखाली नाल्यात जाऊन कोसळले. विशेष म्हणजे, या वाहनामधील सीट काढण्यात आल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी महागाव परिसरात सीट काढून वाहनांमधून जनावरे चोरी करून नेण्याच्या घटना घडल्याने या प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. वाहनावर नंबर प्लेट नसल्याने वाहनाचा मूळ मालक कोण, गाडी कुठून आली आणि ती नेमकी दिग्रस की पुसद परिसरातील आहे का, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
वाहनामध्ये संशयास्पद साहित्य आढळल्याने या प्रकरणातून मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा माग काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठळक मुद्दे
संशयित वाहन पुलाखाली नाल्यात कोसळले
वाहनात गुंगीची इंजेक्शने आढळली
वाहनावर नंबर प्लेट नव्हती
अपघातानंतर सर्व संशयित फरार झाले
पोलिसांकडून तपास सुरू
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची नागरिकांची मागणी
दरम्यान, पोलीस यांनी या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून परिसरातील जनावरे चोरीचे गुन्हे उघड करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



