पैनगंगा–पूस नदीपात्रात अवैध रेतीचा सुळसुळाट; महसूल प्रशासनाची ‘अजब अज्ञान’ भूमिका

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील पैनगंगा व पूस नदीपात्रात जागोजागी अवैध रेती उत्खनन व साठा खुलेआम सुरू असूनही महसूल विभाग व संबंधित कर्मचाऱ्यांना याची माहिती नसल्याचे दाखविले जात आहे, हे आश्चर्यकारक असून गंभीर बाब ठरत आहे.
हिवरा, फुलसांगी, भोसा, सवना, मोरथ, हिंगणी, दहिसावळी आदी गावांच्या परिसरातील नदीपात्रात रेतीचे मोठमोठे डिगारे गाळून, चाळून साठवून ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संध्याकाळी या रेतीचा बंदोबस्त करून वाहतूक सुरू केली जाते, मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध रेती साठा असतानाही महसूल विभाग, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयाकडून मौन बाळगले जात असल्याने संशय अधिक बळावतो. “हे अवैध रेतीचे डिगारे कुणाच्या आशीर्वादाने?” असा प्रश्न आता नागरिक खुलेआम विचारू लागले आहेत.
स्थानिकांमध्ये चर्चा आहे की, महागाव तहसीलदारांच्या आशीर्वादानेच ही अवैध रेती वाहतूक सुरू आहे, असा आरोप होत असून या प्रकरणात कारवाई कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पैनगंगा व पूस नदीपात्रातील अवैध रेती उत्खननामुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह बदलत असून पर्यावरणीय धोके वाढत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा गप्प बसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांकडून आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला जात आहे.



