उमरखेडच्या सुपुत्राला IIT मद्रासमधून डॉक्टरेट सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांच्या मुलाचा अभिमानास्पद प्रवास

एस पी दळवी
उमरखेड — उमरखेड येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक कांबळे यांचा मुलगा ऋषीकेश दिपक कांबळे याला तामिळनाडूतील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था, IIT मद्रास, चेन्नई येथून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
ऋषीकेश यांनी IIT मद्रासच्या Ocean Engineering विभागातून Doctor of Philosophy ही पदवी प्राप्त केली. त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. के. विजय होते.
शैक्षणिक प्रवास
ऋषीकेश यांचे प्राथमिक शिक्षण उमरखेड येथील संत गोरोबा विद्यालय मध्ये 10वी पर्यंत, तर 12वी गावंडे महाविद्यालय, उमरखेड येथे झाले. त्यानंतर त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय मधून मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. पूर्ण केले. पुढे NIT भोपाळ, मध्य प्रदेश येथून एम.टेक केले आणि अखेर IIT मद्रास येथे पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना 26/06/2026 रोजी डॉक्टरेट पदवी जाहीर झाली.
दीक्षांत समारंभ
IIT मद्रासचा दीक्षांत समारंभ 17/07/2026 रोजी चेन्नई येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. करुणानिधी, जनरल मॅनेजर, ONGC, जयपूर होते. यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अब्दुस समद यांच्या हस्ते ऋषीकेश यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान करण्यात आली.
कुटुंब व समाजाचे योगदान
सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक कांबळे यांनी दारव्हा, उमरखेड आणि महागाव पोलीस स्टेशनमध्ये सेवा बजावली आहे. मुलांच्या तांत्रिक शिक्षणावर भर देत त्यांनी समाजसेवा आणि व्यवसायाबद्दलही मुलांमध्ये आवड निर्माण केली.
या शैक्षणिक प्रवासात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी, उमरखेड पोलीस, उमरखेड वासीय, पत्रकार बंधू-भगिनी, सामाजिक संघटना, सर्वपक्षीय राजकीय मंडळी, संत गोरोबा विद्यालयाचे शिक्षक आणि गावंडे महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी मोलाची साथ दिल्याचे दिपक कांबळे यांनी सांगितले.
ऋषीकेश यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडील, प्राथमिक शिक्षक, व्याख्याते आणि प्राध्यापकांना तसेच आपले मामा जनार्धन साळवे माजी सैनिक व चंद्रकांत साळवे यांना दिले आहे.
उमरखेडच्या या सुपुत्राच्या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



