Uncategorized

कोदंरी येथे नाला खोलीकरणाच्या कामामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याचा आरोप; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी


महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मौजा कोदंरी येथील नाला खोलीकरणाच्या कामामुळे मुसळधार पावसात शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चौकशी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
मौजा कोदंरी येथील शेतकरी उत्तम रत्ना चव्हाण व किशोर रत्ना चव्हाण यांच्या सर्वे क्रमांक ४ पैकी २ या शेतातील सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नाल्यालगतची जमीन खरडून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नाला खोलीकरणाचे काम योग्य तांत्रिक पद्धतीने न झाल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाऊन नाल्याची धूप वाढली. त्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेली असून नाल्यालगतची शेती तसेच विहिरीलाही धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला असून, या कामाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित ठेकेदार व जलसंधारण विभागाची अधिकृत भूमिका वृत्त लिहिपर्यंत प्राप्त होऊ शकलेली नाही. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button