२० वर्षांचा ‘सिक्युरिटी घोटाळा’ उघड! यवतमाळ जिल्हा बँकेत एकाच एजन्सीला कंत्राट; संचालकांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी

प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मागील २० वर्षांपासून एकाच सिक्युरिटी एजन्सीला कंत्राट देत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंजाबराव देशमुख खडगेकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, वीस वर्षांच्या कालावधीत केवळ दोन वर्षे डायमंड सिक्युरिटी, वर्धा यांना कंत्राट देण्यात आले, तर उर्वरित काळात पॉईंट सिक्युरिटी, यवतमाळ या एकाच एजन्सीला काम देण्यात आले. संचालक मंडळाने दर तीन वर्षांनी टेंडर प्रक्रिया ‘मॅनेज’ करून हे कंत्राट कायम ठेवले, असा आरोप आहे.
सन 2016 पूर्वी साध्या वाहनातून कॅश वाहतूक केली जात होती. नाबार्डने हरकत घेतल्यानंतर वाहन खरेदी करून त्यासोबत चालक व गार्ड पुरविण्यात आले. सध्या प्रती किलोमीटर ₹31.50 दराने बिले काढली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बँकेच्या 84 शाखांसाठी 94 गार्ड आवश्यक असताना 120 गार्डचे पेमेंट काढले जाते. त्यापैकी 26 गार्ड प्रत्यक्ष शाखांवर नसून काही माजी अध्यक्ष व संचालकांच्या घरी काम करत असल्याचा आरोप आहे, मात्र पगार बँकेकडूनच दिला जातो.
याशिवाय, डायमंड सिक्युरिटीला दोन वर्षांचे कंत्राट असतानाही पॉईंट सिक्युरिटीच्या संचालकांनी अधिकारपत्राच्या आधारे पेमेंट व कॅश वाहतुकीचे काम केले, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या सर्व गैरप्रकारातून झालेली अपराधी रक्कम संचालक मंडळाकडून वसूल करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. सध्या बँकेचा एनपीए ५० टक्क्यांहून अधिक गेल्याने, बँकेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.



