शिक्षकांच्या मागणीसाठी अनोखा शैक्षणिक सत्याग्रह

- सोनदाभीतील विद्यार्थी शाळेबाहेर; मोकळ्या मैदानात राजमाता जिजाऊ–स्वामी विवेकानंद जयंती साजरी
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम व बंदी भागातील सोनदाभी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या तीव्र कमतरतेविरोधात गावकऱ्यांनी आणि पालकांनी सुरू केलेला आंदोलनात्मक लढा अधिकच धारदार झाला आहे. ९ जानेवारीपासून एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवत, आज सर्व विद्यार्थ्यांनी शाळेऐवजी मोकळ्या मैदानात एकत्र येत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी केली. मात्र हा उत्सव आनंदाचा नसून शिक्षण विभागाच्या उदासीनतेविरोधातील मूक पण ठोस इशारा ठरला आहे.
शिक्षकांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळा आजही विद्यार्थ्यांविना ओस पडलेली दिसून आली. दुसरीकडे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत मोकळ्या मैदानात प्रतीकात्मक शाळा भरवली. “शिक्षण आमचा हक्क आहे, शिक्षक आमची गरज आहे,” हा संदेश या उपक्रमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सोनदाभी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ७ पर्यंत सुमारे १३० ते १३५ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. महिला शिक्षिका राजश्री चंद्रकांत पडळकर यांची अवघ्या महिन्यात प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने शाळेतील शिक्षकसंख्या पुन्हा अपुरी पडली. महिला शिक्षिकेअभावी विद्यार्थिनींच्या

सुरक्षितता, समुपदेशन व दैनंदिन अडचणी गंभीर बनल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार निवेदने, स्मरणपत्रे देऊनही शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
या आंदोलनाला अधिक धार देत आजचा जयंती उत्सव मोकळ्या मैदानात साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणाशिवाय विकास नाही’ हे घोषवाक्य प्रत्यक्ष कृतीतून मांडले. हा कार्यक्रम म्हणजे शासनाच्या निष्क्रियतेवर मारलेला जाहीर चाबूक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे.
दरम्यान, २५ जानेवारीपर्यंत शिक्षक उपलब्ध न झाल्यास २६ जानेवारी रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपसरपंच मारोती पिलवंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारोती लुटे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. आता शिक्षण प्रशासन या अनोख्या शैक्षणिक सत्याग्रहाची दखल घेते का, की विद्यार्थ्यांचे भविष्य असेच मोकळ्या मैदानात ढकलले जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



