उमरखेडमध्ये खळबळ; अंबोना तलावात अज्ञात महिलेचा मृतदेह
झाडावर आढळली पर्स; महिलेची ओळख अद्याप अनोळखी — मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
उमरखेड शहरालगतच्या चुरमुरा रोडवरील अंबोना तलावात २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. तलाव परिसरात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ११२ क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच उमरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिची ओळख निश्चित करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
झाडावर पर्स सापडल्याने तपासाला वेग?
दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरातील झाडावर एका महिलेची पर्स आढळल्याची माहिती समोर आली आहे. ही पर्स मृत महिलेचीच आहे का, त्यामध्ये कोणते साहित्य अथवा ओळख पटविणारे कागदपत्र आहे का, तसेच ती पर्स घटनास्थळी कशी पोहोचली, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मृत्यू अपघाती की अन्य कारणाने?
महिलेचा तलावात मृतदेह आढळल्याने तिचा मृत्यू अपघाती बुडून झाला की अन्य कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. उत्तरीय तपासणीचा अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि पोलिस तपासातूनच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे संकलित केल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे.
ओळख पटविणे ठरणार तपासातील पहिला टप्पा
महिलेची ओळख पटणे हे या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे पाऊल असून, परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी, उपलब्ध कागदपत्रे, पर्समधील वस्तू, CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास करण्याची गरज आहे.
घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक गौरव कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार अमोल गुंडे व बीट जमादार दिलीप चव्हाण करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी तक्रार दाखल झाल्याची माहिती उपलब्ध नव्हती.
अज्ञात महिलेचा मृतदेह तलावात कसा पोहोचला? झाडावर आढळलेली पर्स या घटनेशी संबंधित आहे का? महिलेची ओळख काय? आणि तिच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



