हिमायतनगर शहरात SBI बँकेकडून राष्ट्रध्वजाचा घोर अपमान;प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवलाच नाही!


हिमायत नगर (प्रतिनिधी शेख खयूम खुरेशी):
आज संपूर्ण देश ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करत असताना, हिमायत नगर येथील भारतीय स्टेट बैंक (SBI) कृषी वाणिज्यिक शाखेने देशाच्या अस्मितेचा जाहीर अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुपारचे १:४२ वाजले तरी बँकेच्या परिसरात ध्वजारोहण करण्यात आले नव्हते.
अधिकाऱ्यांचा माज की देशद्रोही वृत्ती?
बँकेचे शटर बंद असून ध्वजस्तंभ रिकामा असल्याचे पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी नियमांनुसार प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय इमारतीवर ध्वजारोहण अनिवार्य असताना, SBI च्या अधिकाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखवली आहे. एसी केबिनमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या या अधिकाऱ्यांना राष्ट्रध्वजाचा विसर पडला की हा त्यांनी जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तातडीने निलंबनाची मागणी:
या गंभीर कृत्यामुळे हिमायत नगरच्या जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. भारतमातेचा अपमान करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित (Suspend) करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हाधिकारी आणि बँक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.



