Uncategorized

आमणी बु. ग्राम विविध सहकारी सोसायटीचा अजब कारभार; अपात्र कर्जदाराकडून बँक प्रतिनिधीची निवड, लेखी तक्रार दाखल


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील आमणी बु. ग्राम विविध सहकारी सोसायटीत नियमबाह्य आणि कायदाविरोधी कारभार उघडकीस आला आहे. सोसायटीच्या सचिवाने बँक प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी थकीत कर्जदार सभासदाकडून चेक घेऊन कर्ज नसल्याचे भासवले, मात्र प्रत्यक्षात कर्जाची रक्कम दुसऱ्या दिवशी संबंधित खात्यात जमा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्या वेळी सदर सभासद बँक प्रतिनिधी पदासाठी उभा होता, त्या वेळी तो कायद्याने अपात्र असताना सचिवाने हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, आमणी बु. ग्राम विविध सहकारी सोसायटीतील काही संचालक स्वतः थकीत कर्जदार असतानाही त्यांनी बँक प्रतिनिधी निवडणुकीत मतदान केले, तसेच थकीत संचालकालाच बँक प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
या प्रकरणी निलेश दत्तराव चिंचोलकर यांनी दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ तसेच सहकार अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
सहकार कायद्यानुसार संस्थेचा थकीत कर्जदार संचालक होऊ शकत नाही आणि तो अपात्र ठरतो, असे असतानाही अपात्र संचालकांनी मतदान करून नियमबाह्य व बेकायदेशीर बँक प्रतिनिधीची निवड केल्यामुळे हा प्रकार गंभीर कायदाविरोधी ठरतो, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी दोन ते तीन सहकारी संस्थांमध्येही अशीच परिस्थिती असल्याची माहिती समोर आल्यानंतर, सहाय्यक निबंधक, पुसद यांनी संबंधित बँक प्रतिनिधी पाठविणाऱ्या संस्थांतील सर्व संचालक थकीत आहेत की नाही, याची चौकशी सुरू केली आहे.
याबाबत माहिती देताना सहकार अधिकारी पिंपळखेडे (श्रेणी–१) यांनी सांगितले की, “थकीत संचालक सहकारी संस्थेचा संचालक राहू शकत नाही. अशा अपात्र संचालकांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नाही. त्यामुळे दोन ते तीन सोसायट्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय बँक प्रतिनिधी पाठविण्यात येणार नाही.”
या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय पुढाऱ्यांची धावपळ सुरू असून, सहकार क्षेत्रातील या गंभीर गैरप्रकारांकडे सर्व राजकीय व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button