हिमायतनगर महामार्गावर कंत्राटदाराचा महाघोटाळा; मुरुम विकून नाल्यांच्या पायात भरला गावचा कचरा! आमदार, खासदारांना फक्त मतं मागायलाच वेळ; निकृष्ट कामांकडे पाहायला सवड नाही? – शेख सलीम यांचा थेट सवाल

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी, शेख खय्यूम): शहरातील मुख्य महामार्गालगत सुरू असलेल्या नाली बांधकामात कंत्राटदाराने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरपंचायतीच्या नियमांना हरताळ फासत, रस्त्याच्या पायालाच सुरुंग लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटदाराच्या या मनमानीमुळे कोट्यवधींचा महामार्ग पहिल्याच पावसात खचण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
मौल्यवान मुरुमाची काळ्या बाजारात विक्री
शासकीय तांत्रिक नियमांनुसार, नालीच्या खोदकामातून निघालेला मूळ मुरुम (Murrum) आणि गिट्टी (Metalling) हाच पाया मजबूत करण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे. मात्र, कंत्राटदाराने हा मौल्यवान मुरुम परस्पर काळ्या बाजारात विकून स्वतःचे खिसे भरले. गंभीर बाब म्हणजे, मुरुम गायब केल्यानंतर उघड्या पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये चक्क जेसीबीच्या साहाय्याने शहरातील टाकाऊ प्लास्टिक, कचराकुंडीतील घाण आणि ओला कचरा दाबून बुजवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराचा हा कचरा उघड्या डोळ्यांनी दिसत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
”लोकप्रतिनिधींना एसी गाड्यांमधून उतरायला वेळ नाही!”
या महाघोटाळ्यावर स्थानिक नागरिक शेख सलीम यांनी प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. त्यांनी थेट आरोप करताना म्हटले की, “आम्ही खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना मतदान करून डोक्यावर बसवले ते काय ही घाण पाहण्यासाठी? निवडणुकीनंतर हे लोकप्रतिनिधी कधी फिरकलेत का? डोळ्यांसमोर शासकीय मालमत्तेची लूट आणि इतके निकृष्ट काम सुरू असताना हे सर्वजण मुखगिळून गप्प का आहेत? काम कसेही झाले तरी यांना काही फरक पडत नाही, कारण जनता यांच्या अजेंड्यावरच नाही!”
पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची भीती; चौकशीची मागणी
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभा असलेला हा नालीचा पाया पहिल्याच पावसाळ्यात खचणार, हे उघड आहे. या कामावर ना नगरपंचायतीचे नियंत्रण आहे, ना पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांचे! लोकप्रतिनिधी केवळ नावापुरती पडे उपभोगत आहेत का, असा सवाल आता जनता विचारत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून तात्काळ चौकशी करून कंत्राटदाराचा परवाना रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिमायतनगरच्या नागरिकांनी दिला आहे.



