महागाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा घोटाळा? चौकशी अहवाल असूनही कारवाई नाही;

नागरिकांचा संताप
महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे चौकशी अहवालातून समोर आले असूनही संबंधितांवर अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, घाणमुख, करंजी, वाकोडी, माळवागत, करंजखेड, धारमोहा तसेच इतर काही ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. चौकशीमध्ये काही ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकांनी शासनाच्या निधीत अनियमितता व अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे.
या अहवालात संबंधितांकडून शासनाच्या निधीची रक्कम वसूल करण्याची तसेच पुढील कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली असल्याचे समजते. मात्र, पंचायत समिती महागाव मार्फत अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने हे प्रकरण प्रलंबितच राहिले आहे.
ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांमध्ये सरपंचांना अपात्र ठरवणे, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच अपहार झालेली रक्कम वसूल करणे अपेक्षित असते. परंतु गेल्या चार वर्षांपासून अनेक चौकशी अहवाल पंचायत समितीत पडून असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणांची दखल घेऊन संबंधित चौकशी अहवालांवर तातडीने कारवाई करावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाच्या निधीचा अपहार झालेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



