Uncategorized

अमानपूर ग्रामपंचायतीचा सुरक्षा वाढीसाठी मोठा पाऊल: गावात सौर CCTV यंत्रणा कार्यान्वित

एस पी दळवी

उमरखेड तालुक्यातील अमानपूर गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी अमानपूर ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, ग्रामदैवताचे मंदिर आणि गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या यंत्रणेमुळे वीज खंडित झाली तरी २४ तास पाळत ठेवणे शक्य होणार आहे.

सरपंच सौ.दर्शना बाबूलाल चव्हाण यांनी सांगितले की, “हा CCTV गावचा तिसरा डोळा असून तो झोपत नाही, थकत नाही आणि पक्षपात करत नाही. शाळेत जाणाऱ्या मुला मुलींची सुरक्षा, रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरी-घरफोडीला आळा, अंगणवाडीतील मुलांना वेळेवर नाश्ता मिळतो किंवा नाही आणि शिक्षकांची उपस्थिती यावर यामुळे लक्ष ठेवता येईल तसेच गावात काही अनुचित प्रकार घडल्यास खरे-खोटे ठरवण्यासाठी कॅमेऱ्याचे फुटेज पुरावा म्हणून काम करेल.”

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कॅमेरे केवळ सार्वजनिक ठिकाणीच बसवण्यात आले आहेत. कोणत्याही नागरिकाच्या घर, अंगण किंवा शेतात यांची नजर नाही, त्यामुळे गावकऱ्यांची खासगी गोपनीयता १००% सुरक्षित राहणार आहे. फुटेजची जबाबदारी सरपंच, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापक यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्याचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही सरपंचांनी दिली आहे.

गावाला सुरक्षित आणि आदर्श बनवण्याच्या दिशेने टाकले हे पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button