टेंभी–हिवरा मार्गावर अवैध मुरूम उत्खननाचा आरोप; शासन महसुलाला फटका, कारवाईची मागण

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील टेंभी ते हिवरा जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूम उत्खनन करून रोडलगत भर टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. संबंधित ठिकाणी मुरूमाची रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असून शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच वन विभागाच्या हद्दीतूनही खुलेआम मुरूम आणले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या अवैध उत्खननामुळे परिसरातील टेकड्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून पर्यावरणीय हानी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
महागाव तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा प्रकार सर्रास सुरू असून प्रशासन मात्र कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. वन हद्दीतील या अवैध उत्खननास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी व अवैध उत्खनन त्वरित थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.



