शहर

बूथ प्रमुखांना दिलेले ‘लेटर पॅड’ फक्त कागदावरच; घोषणांची अंमलबजावणी शून्य भाजप जिल्हा समन्वयकांच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव–उमरखेड मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी 21 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात “बूथ प्रमुख शक्ती, केंद्रप्रमुख गाव विकासाचा पाया” या मथळ्याखाली मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्या वेळी बूथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांना गाव विकासासाठी कामे देण्यासाठी अधिकृत लेटर पॅड देण्यात आले होते.
“जोपर्यंत बूथ प्रमुख पत्र देणार नाही, तोपर्यंत ठेकेदाराला काम नाही” अशी ठाम घोषणा करण्यात आली होती.
मात्र पाच महिने उलटूनही या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याचे कुठेही दिसून आले नाही. मतदारसंघातील कोणत्याही गावात बूथ प्रमुख किंवा शक्ती केंद्रप्रमुखांच्या लेटर पॅडवर कोणतेही विकास काम दिल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे ही घोषणा केवळ नावापुरती व प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
महागाव तालुक्यात बाहेरील ठेकेदारांना ठराविक टक्केवारीवर कामे दिली जात असल्याची चर्चा असून, डमी ठेकेदारांच्या माध्यमातून आमदार निधीतून निकृष्ट दर्जाची रस्ते कामे झाल्याचे आरोपही होत आहेत. बांधकाम विभागामार्फत कामे देण्यात आली असली तरी निकृष्ट दर्जाच्या कामाची साधी चौकशीही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बूथ प्रमुखांशी संवाद साधला असता, कोणत्याही बूथ प्रमुखाच्या लेटर पॅडवर ठेकेदाराला काम दिल्याचे उदाहरण नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बूथ प्रमुख भ्रमात पडल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
21 सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषद व कार्यकर्ता बैठकीत केलेल्या घोषणा कागदावरच राहिल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. त्या कार्यक्रमाला आमदार किसन वानखडे, माजी आमदार नामदेव ससाने, अजय पुरोहित, रमेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अ‍ॅड. अनिल माने यांनी केले, संचालन सुनील हिंगमिरे व प्रकाश दुधेवार यांनी केले, तर सविता पाचकोरे यांनी आभार मानले होते.
घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील फरक आता कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी वाढताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button