नगर परिषद उमरखेडच्या नळ कनेक्शन शुल्कावर प्रश्नचिन्ह

सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड – नगर परिषद उमरखेडमध्ये नळ कनेक्शन देताना अतिरिक्त ₹१२००/- रुपये मिटर आकार घेत असल्याचा आरोप नगर परिषदेच्या गट नेता प्रशांत उर्फ विजय कृपासागर हरडफकर यांनी केला आहे. त्यांनी मुख्याधिकारी यांना पत्र लिहून सविस्तर माहिती मागितली आहे.
हरडफकर यांनी आरोप केला की, सन २०११-१२ या आर्थिक वर्षामध्ये नगर परिषद उमरखेडने ठराव घेऊन नळ कनेक्शन देताना ₹१२००/- मिटर भाडे/आकार अनामत रक्कम स्वीकारावी असा एकमताने ठराव केला होता. त्यानुसार २०१२ पासून आज रोजी पर्यंत नळ कनेक्शन देताना किती नळधारकांकडून मिटर भाडे आकारले आहे आणि त्यांना नळ कनेक्शन सोबत मिटर देण्यात आले की नाही याची माहिती मागितली आहे.
त्यांनी असेही विचारले आहे की, दिले असल्यास किती नळधारकांना मिटर दिले याची माहिती द्यावी. अन्यथा ₹१२००/- रुपये अनामत रक्कमचा अपहार कोठे केला आणि कसा केला याची सविस्तर माहिती द्यावी.
नगर परिषदेच्या या प्रकरणावरून नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून, मुख्याधिकारी यांच्याकडून याबाबत सविस्तर उत्तराची अपेक्षा आहे.



