Uncategorized

नगरवाडीतील २३ वर्षीय युवा शेतकऱ्याची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल; अल्पभूधारक कुटुंबावर कर्जाचा भार


महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील नगरवाडी शिवारात २३ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. विष्णू सदानंद मेटकर असे मृत युवा शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने नगरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेटकर कुटुंबावर युनियन बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. अल्पभूधारक कुटुंब असून डोक्यावर कर्जाची जबाबदारी होती. त्यातच शेतीच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ न झाल्याने विष्णू आर्थिक विवंचनेत असल्याचे कुटुंबीय व स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
वडील दिव्यांग; कुटुंबाची जबाबदारी तरुणाच्या खांद्यावर
विष्णू यांचे वडील दिव्यांग असून, घरातील अनेक जबाबदाऱ्या विष्णू यांच्यावर होत्या. नगरवाडी शिवारातील त्यांच्या वाट्याला सुमारे पाच एकर शेती असून यामध्ये कपाशीचे पीक घेण्यात आले होते. मात्र, कपाशीच्या उत्पादनात घट झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर विष्णू यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
युवा शेतकऱ्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी विष्णू यांच्या मृत्यूने मेटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्जबाजारीपणा, शेतीमालाला अपेक्षित उत्पन्न न मिळणे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी कुटुंबांसमोरील आर्थिक संकट पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जाचा वाढता भार आणि शेतीमालाच्या उत्पादन-विक्रीतील अडचणी यावर शासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button