साई (ई) येथे जिओ नेटवर्क ठप्प; नागरिक संतप्त

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील साई (ई) येथे जिओचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने संपूर्ण गावातील दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अचानक सिग्नल अधूनमधून गायब होत असल्यामुळे मोबाईल कॉल, इंटरनेट सेवा तसेच विविध ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गावातील नेटवर्क अचानक बंद पडत आहे. त्यानंतर अनेकांनी मोबाईल रीस्टार्ट करणे, एअरप्लेन मोड ऑन-ऑफ करणे तसेच सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये वापरून पाहणे असे विविध प्रयत्न केले; मात्र नेटवर्क सेवा पूर्ववत झाली नाही. काही ठिकाणी ‘नो सर्व्हिस’ असा संदेश दिसत असून काही भागात अत्यंत कमी सिग्नल मिळत असल्याची माहिती आहे.
नेटवर्क सेवा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग आणि शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. स्पर्धा परीक्षा अर्ज भरणे, शिष्यवृत्ती प्रक्रिया तसेच महाविद्यालयीन प्रवेशाशी संबंधित ऑनलाईन कामे रखडली आहेत.
व्यापाऱ्यांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. यूपीआय व्यवहार ठप्प झाल्याने बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. किराणा दुकाने, पेट्रोल पंप व इतर आस्थापनांमध्ये ऑनलाईन पेमेंट होत नसल्याने ग्राहक आणि दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तांत्रिक बिघाड किंवा मोबाईल टॉवरमधील अडचणीमुळे सेवा खंडित झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेटवर्क सेवा नेमकी कधी सुरळीत होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे.
दरम्यान, Jio� कंपनीने तातडीने नेटवर्क सेवा पूर्ववत करावी तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोपाळ राठोड यांनी संबंधित कंपनी व प्रशासनाकडे केली आहे.



