घरकुल गैरप्रकाराची माहिती मागितल्याने ग्रामसभा गुंडाळल्याचा आरोप

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
पिंपळगाव कान्हा : घरकुल योजनेतील कथित गैरप्रकाराची माहिती मागितल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे न देता ग्रामसभा गुंडाळल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांनी समाधानकारक उत्तरे न देता ग्रामसभा सोडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिक विकास प्रताप राठोड व गणेश गुलाब शिंदे यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायतीकडे माहितीचा अर्ज करून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड, मंजूर निधी तसेच घरकुल बांधकामाबाबत माहिती मागितली होती. काही लाभार्थ्यांनी दुसऱ्यांच्या घरांचे छायाचित्र दाखवून घरकुलाचा निधी उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच गावातील अपंग, विधवा व भूमिहीन नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ न देता आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना लाभ देण्यात आल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. या सर्व बाबींवर ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागण्यात आले.
मात्र, नागरिक मोठ्या संख्येने प्रश्न विचारू लागल्यानंतर ग्रामसभा सुरू न ठेवता सरपंच व ग्रामसेवक तेथून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आल्याचेही नागरिकांनी सांगितले.
ग्रामसभेमध्ये शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान आणि त्याचा विनियोग याबाबत नागरिकांना माहिती देणे अपेक्षित असताना, नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून घरकुल योजनेतील कथित गैरप्रकाराची माहिती माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून द्यावी तसेच ग्रामसभा न घेता निघून गेल्याच्या प्रकाराची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती महागाव यांच्याकडे करण्याचे सांगितले आहे.



