नॅचरल शुगर साखर कारखाना रोलर पूजन सोहळा संपन्न!

महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना- गुंज परिसरातील नॅचरल शुगर साखर कारखान्याचा दि. 3 जुलै रोजी रोलर पूजन नॅचरल शुगर समूहाचे अध्यक्ष कृषिरत्न बीबी ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या शुभप्रसंगी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
गुरुवार दि. 3 जुलै रोजी नॅचरल शुगर साखर कारखान्यांच्या या वर्षीच्या हंगामाचा प्रारंभ होत असल्याने नॅचरल शुगर समूहाचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते रोलर पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नॅचरल शुगर साखर कारखाना महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून पुढे येत आहे. महागाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी नॅचरल शुगर कारखाना महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. सोबतच ऊस उत्पादक कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन विदर्भामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देण्याचा मान नॅचरल शुगर यांनी मिळवला. येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅचरल शुगर साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करण्याचे आव्हान या प्रसंगी कृषिरत्न बी.बी. ठोंबरे यांनी केली. पार पडलेल्या रोलर पूजन कार्यक्रसाठी प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी शिवाजीराव देशमुख, तात्या शिंदे वेणी, अमृतराव देशमुख आंबोडा, विजय सूर्यवंशी महागाव, विशाल पवार कलगाव, तुकाराम कदम कलगाव, वामनराव देशमुख सर, विनायक सरसमकर आणि कारखान्याचे मॅनेजर कदम यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.



