मुख्यमंत्री महोदयांच्या घोषणेनुसार घरकुलधारकांना ५ ब्रास मोफत रेती द्यावी; हिमायतनगरवासीयांची तहसीलदार मॅडम यांच्याकडे आग्रही मागणी

हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम): केंद्र व राज्य शासनाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत गरिबांना हक्काच्या घरांची आस दाखवली जात असताना, हिमायतनगर तालुक्यात रेतीबंदी आणि हप्ते न मिळाल्याने बांधकामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. वाळू वाहतुकीवर रॉयल्टी नसल्याने पोलीस व महसूल प्रशासनाकडून गाड्यांवर कारवाया होत असल्याने वाळू पुरवठा थांबला आहे.
त्यामुळे “शासनाने घरकुल मंजूर केले, पण रेतीबंदीमुळे कामे कशी पूर्ण करायची? आम्ही घरांचे बांधकाम काय मातीने करायचे का?” असा संतापजनक सवाल घरकुल लाभार्थी विचारत आहेत.
गेल्या ७-८ महिन्यांपासून हप्ते बंद; उपासमारीची वेळ:
या योजनेचा लाभ अत्यंत गरीब व मजूर वर्ग घेतो. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून घरकुलाचा एकही हप्ता (बिल) जमा झालेला नाही. आधीच हाताला काम नसल्याने पोट मारून, उपाशी राहून लोकांनी पैशांची कशीबशी जुळवाजुळव केली, पण हप्ते अडकल्यामुळे आणि रेती न मिळाल्यामुळे नागरिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
जुने कच्चे घर पाडल्यानंतर नवीन बांधकाम रखडल्याने या गरिबांनी किती दिवस भाड्याच्या घरात किंवा उघड्यावर राहायचे, हा प्रश्न आहे. त्यातच प्रशासनातील खालील स्तरातील कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणीही करत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांची घोषणा व मागणी:
राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत (रॉयल्टी माफ) देण्याची स्पष्ट घोषणा केली आहे.
त्यामुळे गरिबांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा करावेत आणि तहसीलदार मॅडम यांनी तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही व नम्र मागणी हिमायतनगर परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.



